Sunday, July 12, 2009

कथक नृत्य

कथक ही शास्त्रीय नृत्यशैली उत्तर भारतातली.कथक या शब्दाचा उगम कथा या शब्दातून झाला आहे.कथाकथन करणारा तो कथक.असे म्हणतात की लव-कुशांनी श्रीरामांची कथा स्वयं श्रीरामांना कथन केली तेव्हापासून ही कथाकथनाची परंपरा सुरू झाली.अश्या कथा सांगणाऱ्या लोकांची एक जमात बनली.ही माणसे गावोगावी भ्रमण करून संगीत व अभिनयाचा वापर करून कथाकथन करत आणि आपली उपजीविका चालवत.हेच होते पारंपारिक कथिक अथवा कथक.

रामायण, महाभारत, पुराण व इतिहासातील कथा सांगून हे कथक धार्मिक व सामाजिक प्रबोधन करत.पुढे देशभरात भक्तीची लाट उसळली आणि जागोजागी असंख्य मंदिरं उभी राहिली.कथकांना जणू आपले हक्काचे घर मिळाले.त्यातच वैष्णव कवींच्या अलौकिक वामयाची भर पडली.वैष्णवभक्त देवापुढे तल्लीन होऊन नाचत असत.इथेच कदाचित कथकांनी आपल्या कथाकथनाला नृत्याची जोड दिली.कथेबरोबर नृत्यही फुलू लागले आणि बघता बघता कथक या शास्त्रीय नृत्यशैलीचा जन्म झाला.

भारत परचक्रात असताना मोघल बादशहांना या नृत्याने भुरळ घातली.मंदिरातील हे नृत्य त्यांनी दरबारात आणले आणि इथेच या नृत्याची नाळ रंजकतेशी जोडली गेली.राजदरबाराला साजेसे नृत्य आता हे कथक करू लागले.अर्थातच गीत, संगीत, नृत्यरचना व हावभाव यांत कमालीचे बदल होऊ लागले.कृष्णसख्याची जागा आता सैंया-पिया ने घेतली.देवस्तुतीच्या जागी आता राजस्तुती होऊ लागली.नमस्काराची सलामी झाली.तरीही कथकांच्या मनातला वनमाळी तसाच राहिला.या वनमाळीलाच आता ते सैंया व पिया म्हणून आळवू लागले.मंदिर व दरबार असे कथकचे दोन प्रवाह सुरू झाले.

मंदिर व दरबार अश्या दोन्ही प्रवाहात कलाप्रेमी हिंदू व मुघल राजांनी अत्यंत अनमोल भर घालून ते अधिक समृध्द केले.उत्तर भारतात कथक जिथे जिथे फुलले, बहरले त्या त्या प्रांताच्या नावाने ते ओळखले जाऊ लागले.लखनऊ, बनारस व जयपूर अशी कथकची तीन घराणी निर्माण झाली.पुढे ब्रिटीश राजवटीत मात्र सर्वच भारतीय नृत्यशैलींची अवहेलना झाली त्याला कथकही अपवाद नव्हते.तश्या प्रतिकूल परिस्थितीतही कथकच्या सर्व गुरूंनी आपल्या सृजनाने कथकमधे अधिक नाविन्य व सौंदर्य आणले आणि या अभिजात नृत्यशैलीचा अनमोल ठेवा आपल्यापर्यंत पोहोचवला.

आज कथक रंगमंचावर आले आहे.मंदिर आणि दरबार या दोन्ही प्रवाहांचा सुंदर मिलाफ कथकच्या रंगमंचीय अविष्कारात दिसून येतो.प्राचीन काळी मंदिरात होत असे तशीच वंदना आजही रंगमंचावर सादर होते.वंदना म्हणजे देवता किंवा गुरूच्या स्तुतीपर रचना.त्यानंतर सादर होतो थाट आणि आमद.ही खास दरबारी पेशकश.थाटमध्ये अंग, प्रत्यंग, उपांग यांचं लयबद्ध संचालन करत नर्तकी डौलदार हालचालींनी कथकचे विविध पवित्रे दाखविते.आमद हा मूळचा फारसी शब्द, आमद म्हणजे आगमन.पूर्वी दरबारात नर्तकी प्रवेश करताना जे नृत्य करायची त्याला आमद म्हणत.गतनिकास ही सुद्धा दरबारी देणगी.लास्यांगाने जाणारी नर्तकीची नाजूक चाल म्हणजे गत.पारंपारिक कथाकथन आता कवित्त, भजन अथवा ठुमरी अशा संक्षिप्त स्वरूपात पहायला मिळतं.कवित्त ही वर्णनात्मक कविता असते जिला तालबद्ध करून साभिनय नाचलं जातं.ठुमरीचा भाव असतो श्रृंगार, मग तो सामान्य नायक-नयिकेचा असो वा राधा-कृष्णांच्या दिव्य प्रीतीचा.ठुमरीला दरबारात खूप मान्यता मिळाली.गतभाव कथकचं वैशिष्ट्य.यात पुराणातील एखादा प्रसंग गीताशिवाय, स्वरतालाच्या आधारे नृत्याभिनयातून सादर केला जातो.कथक नृत्यशैलीत अभिनय अतिशय संयत आणि नैसर्गिक असतो.हस्तमुद्रांचा वापर मर्यादित आणि स्वाभाविक असतो.

कथक नृत्य पूर्णत: हिंदुस्तानी संगीतावर आधारित आहे.हिंदुस्तानी संगीतात समेला अनन्यसाधारण महत्व आहे.कथक नृत्यातही समेची जागा उठावदारपणे दाखवली जाते.पढंत हे कथकचं महत्वपूर्णं अंग.कोणताही तुकडा सादर करण्याआधी नर्तकी आपल्याला त्याचा श्राव्य अनुभव देते.गिरक्या अथवा भ्रमरी हा कथकचा चमकदार पैलू.तत्कार म्हणजे पदन्यास.तत्काराशिवाय कथक नृत्य पूर्ण होऊच शकत नाही.ह्यात नर्तकी लय-तालाशी खेळत उपज अंगाने तालातले बारकावे उलगडून दाखवते.

एकूणच कथकचं सादरीकरण संगीतातील उपज अंगाने म्हणजे उत्स्फूर्तपणे केलं जातं.कार्यक्रमाची रूपरेषा बांधलेली असते, मात्र त्यात सादर होणार नृत्य बांधीव नसतं.ते कलाकाराच्या त्या वेळच्या सर्जनातून उमलत जातं.विलंबित पासून द्रुत लयीपर्यंत चढत जाणारं कथक नृत्याचं सादरीकरण म्हणजे जणू त्या त्या तालाचं लयबद्ध कथनंच; आणि हे कथन करणारा तो कथक!

पूर्वप्रकाशन:अनंत वझे संगीत, कला व क्रिडा प्रतिष्ठान, कल्याण, स्मरणिका २५ जानेवारी २००९

No comments: