Sunday, July 12, 2009

कथक नृत्य

कथक ही शास्त्रीय नृत्यशैली उत्तर भारतातली.कथक या शब्दाचा उगम कथा या शब्दातून झाला आहे.कथाकथन करणारा तो कथक.असे म्हणतात की लव-कुशांनी श्रीरामांची कथा स्वयं श्रीरामांना कथन केली तेव्हापासून ही कथाकथनाची परंपरा सुरू झाली.अश्या कथा सांगणाऱ्या लोकांची एक जमात बनली.ही माणसे गावोगावी भ्रमण करून संगीत व अभिनयाचा वापर करून कथाकथन करत आणि आपली उपजीविका चालवत.हेच होते पारंपारिक कथिक अथवा कथक.

रामायण, महाभारत, पुराण व इतिहासातील कथा सांगून हे कथक धार्मिक व सामाजिक प्रबोधन करत.पुढे देशभरात भक्तीची लाट उसळली आणि जागोजागी असंख्य मंदिरं उभी राहिली.कथकांना जणू आपले हक्काचे घर मिळाले.त्यातच वैष्णव कवींच्या अलौकिक वामयाची भर पडली.वैष्णवभक्त देवापुढे तल्लीन होऊन नाचत असत.इथेच कदाचित कथकांनी आपल्या कथाकथनाला नृत्याची जोड दिली.कथेबरोबर नृत्यही फुलू लागले आणि बघता बघता कथक या शास्त्रीय नृत्यशैलीचा जन्म झाला.

भारत परचक्रात असताना मोघल बादशहांना या नृत्याने भुरळ घातली.मंदिरातील हे नृत्य त्यांनी दरबारात आणले आणि इथेच या नृत्याची नाळ रंजकतेशी जोडली गेली.राजदरबाराला साजेसे नृत्य आता हे कथक करू लागले.अर्थातच गीत, संगीत, नृत्यरचना व हावभाव यांत कमालीचे बदल होऊ लागले.कृष्णसख्याची जागा आता सैंया-पिया ने घेतली.देवस्तुतीच्या जागी आता राजस्तुती होऊ लागली.नमस्काराची सलामी झाली.तरीही कथकांच्या मनातला वनमाळी तसाच राहिला.या वनमाळीलाच आता ते सैंया व पिया म्हणून आळवू लागले.मंदिर व दरबार असे कथकचे दोन प्रवाह सुरू झाले.

मंदिर व दरबार अश्या दोन्ही प्रवाहात कलाप्रेमी हिंदू व मुघल राजांनी अत्यंत अनमोल भर घालून ते अधिक समृध्द केले.उत्तर भारतात कथक जिथे जिथे फुलले, बहरले त्या त्या प्रांताच्या नावाने ते ओळखले जाऊ लागले.लखनऊ, बनारस व जयपूर अशी कथकची तीन घराणी निर्माण झाली.पुढे ब्रिटीश राजवटीत मात्र सर्वच भारतीय नृत्यशैलींची अवहेलना झाली त्याला कथकही अपवाद नव्हते.तश्या प्रतिकूल परिस्थितीतही कथकच्या सर्व गुरूंनी आपल्या सृजनाने कथकमधे अधिक नाविन्य व सौंदर्य आणले आणि या अभिजात नृत्यशैलीचा अनमोल ठेवा आपल्यापर्यंत पोहोचवला.

आज कथक रंगमंचावर आले आहे.मंदिर आणि दरबार या दोन्ही प्रवाहांचा सुंदर मिलाफ कथकच्या रंगमंचीय अविष्कारात दिसून येतो.प्राचीन काळी मंदिरात होत असे तशीच वंदना आजही रंगमंचावर सादर होते.वंदना म्हणजे देवता किंवा गुरूच्या स्तुतीपर रचना.त्यानंतर सादर होतो थाट आणि आमद.ही खास दरबारी पेशकश.थाटमध्ये अंग, प्रत्यंग, उपांग यांचं लयबद्ध संचालन करत नर्तकी डौलदार हालचालींनी कथकचे विविध पवित्रे दाखविते.आमद हा मूळचा फारसी शब्द, आमद म्हणजे आगमन.पूर्वी दरबारात नर्तकी प्रवेश करताना जे नृत्य करायची त्याला आमद म्हणत.गतनिकास ही सुद्धा दरबारी देणगी.लास्यांगाने जाणारी नर्तकीची नाजूक चाल म्हणजे गत.पारंपारिक कथाकथन आता कवित्त, भजन अथवा ठुमरी अशा संक्षिप्त स्वरूपात पहायला मिळतं.कवित्त ही वर्णनात्मक कविता असते जिला तालबद्ध करून साभिनय नाचलं जातं.ठुमरीचा भाव असतो श्रृंगार, मग तो सामान्य नायक-नयिकेचा असो वा राधा-कृष्णांच्या दिव्य प्रीतीचा.ठुमरीला दरबारात खूप मान्यता मिळाली.गतभाव कथकचं वैशिष्ट्य.यात पुराणातील एखादा प्रसंग गीताशिवाय, स्वरतालाच्या आधारे नृत्याभिनयातून सादर केला जातो.कथक नृत्यशैलीत अभिनय अतिशय संयत आणि नैसर्गिक असतो.हस्तमुद्रांचा वापर मर्यादित आणि स्वाभाविक असतो.

कथक नृत्य पूर्णत: हिंदुस्तानी संगीतावर आधारित आहे.हिंदुस्तानी संगीतात समेला अनन्यसाधारण महत्व आहे.कथक नृत्यातही समेची जागा उठावदारपणे दाखवली जाते.पढंत हे कथकचं महत्वपूर्णं अंग.कोणताही तुकडा सादर करण्याआधी नर्तकी आपल्याला त्याचा श्राव्य अनुभव देते.गिरक्या अथवा भ्रमरी हा कथकचा चमकदार पैलू.तत्कार म्हणजे पदन्यास.तत्काराशिवाय कथक नृत्य पूर्ण होऊच शकत नाही.ह्यात नर्तकी लय-तालाशी खेळत उपज अंगाने तालातले बारकावे उलगडून दाखवते.

एकूणच कथकचं सादरीकरण संगीतातील उपज अंगाने म्हणजे उत्स्फूर्तपणे केलं जातं.कार्यक्रमाची रूपरेषा बांधलेली असते, मात्र त्यात सादर होणार नृत्य बांधीव नसतं.ते कलाकाराच्या त्या वेळच्या सर्जनातून उमलत जातं.विलंबित पासून द्रुत लयीपर्यंत चढत जाणारं कथक नृत्याचं सादरीकरण म्हणजे जणू त्या त्या तालाचं लयबद्ध कथनंच; आणि हे कथन करणारा तो कथक!

पूर्वप्रकाशन:अनंत वझे संगीत, कला व क्रिडा प्रतिष्ठान, कल्याण, स्मरणिका २५ जानेवारी २००९

Tuesday, July 7, 2009

पंडित बिरजू महाराज

लखनौच्या प्रसिद्ध कालका-बिंदादीन घराण्यात श्री अच्छन महाराजांच्या पोटी एक सुपुत्र जन्माला आला.त्याचे नाव ब्रिजमोहन मिश्रा.बिरजू हे त्यांचे लाडातले नाव.आज आपण त्यांना पंडित बिरजू महाराज म्हणून ओळखतो.महाराजजींचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ चा.नृत्य त्यांना वारसा हक्कानेच मिळाले होते.त्याशिवाय लय-तालाची नैसर्गिक देणगीही होती.बालपणातच त्यांनी आपल्या वडलांकडून नृत्याचे धडे घ्यायला सुरवात केली.मात्र हे शिक्षण त्यांना फार काळ लाभले नाही.महाराजजींच्या वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांच्या वडलांचा, श्री अच्छन महाराजांचा मृत्यू झाला.

पुढचे शिक्षण महाराजजींनी त्यांचे काका पंडित लच्छू महाराज आणि पंडित शंभू महाराज यांच्याकडे घेतले.लच्छू महाराज लास्यांगात मुरलेले तर शंभू महाराजांचा अभिनयात हातखंडा.महाराजजींनी हे सगळे टीपकागदाप्रमाणे आत्मसात केले.थोर गुरूंकडून मिळालेली विद्या, असामान्य प्रतिभा आणि अंत:प्रेरणा या त्रयींवर पुढे महाराजजींनी कथक नृत्यात नवनवीन प्रयोग केले.त्यांचे पूर्वज दरबारात नृत्य करत होते.ते नृत्य आता रंगमंचावर आले आहे याचे भान ठेवून महाराजजींनी ते अधिकाधिक लोकाभिमुख केले.

महाराजजींचं बालपण अतिशय हालाखीत गेले.त्यांचे काका श्री लच्छू महाराज मुंबईत नृत्य गुरू म्हणून आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते.त्यांनी आपल्या या पुतण्याला मुंबईला येण्याचा प्रस्ताव दिला.खूप मोठी संधी महाराजजींकडे चालून आली होती पण त्यांच्या आईने त्यांना अडवले. चित्रपटसृष्टीत नाव, प्रसिद्धी, पैसा सगळं मिळेल पण घराण्याचं काम अर्धवट राहील.घराण्याचा वारसा पुढे नेणं हे तुझं प्रथम कर्तव्य आहे! असे सांगून आईंनी महाराजजींना जणू त्यांच्या जीवितकार्याची जाणीव करून दिली.महाराजजींनीही आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानली.पुढे काही तुरळक सिनेमांचा अपवाद वगळता महाराजजी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले.

लहान वयात महाराजजींची उत्तम नर्तक म्हणून ख्याती होतीच पण या वयातच उत्तम गुरू म्हणूनही त्यांचा लौकीक होऊ लागला.त्यांनी अनेक नृत्यनाट्यांची रचना केली.’फाग-लीला’, ’मालती-माधव’, ’कुमार संभव’ ही काही नावे.या नृत्यनाट्यांमधे त्यांनी स्वत: प्रमुख भूमिकाही साकारल्या.अलिकडेच त्यांनी ’रोमिओ-ज्युलिएट’ या महान नाटककार शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतीवर सर्वांगसुंदर असे नृत्य-नाट्य सादर केले.संपूर्ण देशभरात आणि विदेशात महाराजजींच्या नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.

महाराजजींचे नृत्य पहाणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो.त्यांच्या सहज-सुंदर रेषा, अप्रतिम पवित्रे, जणू एक जिवंत चित्रशिल्पच!मोराच्या गतीत जेव्हा महाराजजी मोराची चाल करतात तेव्हा खरोखरच लखलखीत पिसाऱ्याचा, डौलदार मानेचा मोर आपल्यासमोर नाचतोय असे वाटते.त्यांचं भावांगही तितकंच सहज सुंदर.एखाद्या कुशल चित्रकाराने कॅनव्हासवर विविध रंगछटा लीलया साकाराव्यात त्याच सहजतेने त्यांच्या चेहेऱ्यावर भाव जिवंत होतात.सौंदर्यरसाच्या या उधळणीत रसिकमन चिंब भिजून जाते!

महाराजजींची प्रतिभा केवळ नृत्यापुरती सीमित नाही.ते एक उत्तम कवी आणि चित्रकार आहेत.तबला, पखावज वाजवण्यात ते वाकबगार आहेत.नृत्यासाठीही त्यांनी अनेक पद्यरचना केल्या आहेत.नवनवीन टुकडे, तोडे, तिहाया यांची निर्मिती तर अविरत चाललेली असते.खूप कमी कलावंत उत्तम शिक्षकही असतात.महाराजजींच्या ठायी हा दुग्धशर्करा योग जुळून आलेला दिसतो.’कथक केंद्र (दिल्ली)’ ते स्वत:ची संस्था ’कलाश्रम’ या प्रवासात त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य तयार केले.बाल, प्रौढ अश्या प्रत्येकाला शिकवण्याची महाराजजींची खास हातोटी आहे.महाराजजींना ऐकताना आपण प्राचीन मंदिरातील कथकापुढे बसलो आहोत असे वाटते.अशा कलावंताला पूर्ण कलाकार म्हटलं तर वावगं ठरू नये.

महाराजजींना अनेक मोठमोठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.देशाचा सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून शासनाने त्यांचा गौरव केला.बनारस आणि खैरागड या विद्यापिठांनी त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे.याशिवाय कालिदास सन्मान, ’नृत्य चुडामणी’, आंध्र रत्न, सोविएत लँड नेहरू पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा गौरविले आहे.

पूर्वप्रकाशन:अनंत वझे संगीत, कला व क्रिडा प्रतिष्ठान, कल्याण, स्मरणिका २५ जानेवारी २००९

Monday, November 24, 2008

निसर्गात हरवून जाण्यासाठी

शुभ्र तरल धुक्याखाली
हिरव्या गार वृक्षांचा डेरा
एकांत पाऊलवाटेवर 
चिंब भिजलेला पाचोळा
मातीचा मंद गंध
अन् धुंद गार ओलावा
अशातून मी एकटीच
चालतेय माझ्याच तंद्रीत

कधी कधी हा एकटेपणा
हवाहवासा वाटतो
पण मन घाबरतं
म्हणून सर्वांबरोबर असून
एकटं रहावसं वाटतं
हे सुखद अनु्भव घेण्यासाठी
निसर्गात हरवून जाण्यासाठी

काटेरी फांदीवरची

काटेरी फांदीवरची
चिमुकली फुले
कुरवाळीत होती
कोवळी उन्हे

Thursday, July 10, 2008

मनातला कोलाहल

मनातला कोलाहल
डोळ्यातूनच झिरपुदे
डोळ्यांच्या गंगाजलात
त्याचे निर्माल्य होऊ दे

ती जखम

ती जखम भळभळतच आहे

"त्याची" उघड्या कपाळावर

आमची मनात खोलवर

वेळूच्या बनात

वेळूच्या बनात

शीळ वारय़ाने घातली

थरथरले नुपूर

सय "निळ्याची" दाटली!